षडयंत्र : न उलगडलेलं कोडं

षडयंत्रच ते...

नाट्यगृह आणि नाटक पहायला येणाऱ्या रसिकांच नात हे पूर्वापार चालत आलं असून ते आजतागायत अतूट आहे.अलीकडे लोकं चित्रपट आणि नाट्यकलेबाबत जागरूक झालेत. त्यामुळे प्रेक्षकांना काय हवं हे दिग्दर्शकालाही ठाऊक असते. त्यातली त्यात आजचा प्रेक्षक वर्ग स्प्स्पेंस थ्रिलर नाटक पहायला मोठी पसंती देत आहे. वास्तविक पाहता मराठी माणसाला कौटुंबिक विषयावर बोलणारा विषय हा आवडतोच. हाच स्प्स्पेंस थ्रिलर विषय घेऊन लेखक सुरेश जयराम आणि दिग्दर्शक डॉक्टर किरण लद्दे  यांनी षड्यंत्र हे २ अंकी मराठी  नाटक ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत सादर केल.                     

                 कोपरगावमधील संकल्पना फाऊंडेशनने हि संकल्पना सादर केलीय. 'षड्यंत्र' हे एक रहस्यमय नाटक आहे. रहस्यनाट्यात गुन्हा आणि गुन्हेगाराचा शोध हाच या नाटकाचा महत्वाचा गाभा असतो. तो यातही आहे. मात्र या नाटकामध्ये घडलेल्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी अखेरपर्यंत लागतच नाही. आणि नाईलाजाने या प्रकरणाची फाईल पोलिसांना बंद करावी लागते. मात्र आपल्या पोलीस पेशाशी प्रामाणिक असणारे पोलीस अधिकारी नगरकर या प्रकरणात तर्कांच्या आधारे एक स्टोरी तयार करतात. त्यात त्यांनी आपले तर्कवितर्क लढवत या प्रकरणाचे धागेदोरे जुळवलेले असतात. परंतु त्याबद्दल त्यांना साशंकता असते. शेवटी संशयित आरोपीनेच ते धागेदोरे योग्य असल्याच सांगितल्यावर नगरकर यांची शंका मिटते आणि खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा समोर येतो.  



या नाटकाचे संपूर्ण कथानक शुभदा व विकास या दोनच व्यक्तींवर सर्वाधिक फिरतांना पहायला मिळत. शुभदा आणि विकास हे जोडपं बांधकाम व्यवसायिक असतात.देशमुख कंस्ट्रक्शन्स हा खरतर शुभदाच्या वडिलांचा व्यवसाय असतो. पण त्यांच्या मृत्यूनंतर हा व्यवसाय त्यांच्या मुलांकडे म्हणजेच शुभदा आणि शुभम यांच्याकडे येतो. मात्र शुभदाच लग्न झाल्यावर विकासच्या हाती सगळा कारभार येतो. शुभदाचा भाऊ शुभम याला सिनेमात संगीतकार व्हायचं असत. मात्र त्याला त्या क्षेत्रात जम न बसवता आल्याने तो पुन्हा वडिलांच्या व्यवसायाकडे वळण्याच ठरवतो. विकास या व्यवसायात अनेक अनैतिक धंदे करत असल्याने शुभमचा त्याला कडवा विरोध असतो. मात्र आपल्या मार्गातील काटा काढण्यासाठी संतप्त झालेला विकास  शुभमचा खून करतो आणि त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचतो. प्रकरण दडपले जाते. भावाच्या आत्महत्येनं शुभदाला प्रचंड धक्का बसतो. त्यातून तिला वेगवेगळे भास होऊ लागतात. तिच्यावर उपचार घ्यायची वेळ येते. आणि विकासला तेच हवं असतं. आपसूक दुसराही काटा त्याच्या मार्गातून दूर होणार असतो.  




                  कंपनीतील दिवेकर हे जुने सुपरवायझर शुभदाला येऊन भेटतात व आपण कंपनी सोडून जात असल्याचं तिला सांगतात. त्यावेळी शुभदाला आपल्या नवऱ्याचा खरा चेहरा कळतो व तिचे डोळे उघडतात. ती कंपनीचा कारभार आपल्या हाती घ्यायचा निर्णय घेते. दरम्यान विकासने शुभदाचा काटा काढायचा कट रचलेला असतो. याकामी त्याला त्याची मैत्रीण लीना मदत करणार असते..पण त्यांचा प्लान तडीस जातो की नाही ? यानंतर असं काय घडतं, की ज्यामुळे सगळी परिस्थितीच बदलते ?.. या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष नाटक पाहिल्यावरच आपल्याला शोधता येतील.

 या नाटकामध्ये डॉ. मयूर तीरमखे यांनी साकारलेली विकासची भूमिका आणि डॉ.श्रद्धा तीरमखे यांनी साकारलेली शुभदाची भूमिका हि नाट्यगृहातील प्रेक्षकांना अगदी शेवटापर्यंत खिळवून ठेवते. नाटकात अधून मधून पण विनोदी आणि कसदार अभिनय साकारणारे दिवेकर पात्र म्हणजेच आकाश खंडागळे. या नाटकात सर्वात कसदार अभिनयाचे श्रेय द्यायचं झालं ते दिल जाईल दिवेकर या पात्राला म्हणजेच आकाश खंडागळे यांना. अगदी दमदार अभिनयाची पराकाष्ठा या पात्रात पाहायला मिळाली. याच पात्रामुळे शुभदाच्या समोर पतीचे  सत्य येत. या नाटकातील सहकलाकार म्हणून शुभमच्या भूमिकेत असलेला प्रथमेश पिंगळे, आशाच्या भूमिकेत दिसलेल्या गायत्री कुलकर्णी, पारुल ठाकूरची भूमिका साकारणाऱ्या डॉ.आस्था सिंह तीरमखे, डॉ. गोडबोले यांची भूमिका साकारणारे गणेश सपकाळ,इन्स्पेक्टर नगरकरची भूमिका करणारे डॉ.संतोष तीरमखे, लीनाच्या भूमिकेत असलेल्या आश्विनी शिंदे, ऍड. परांजपे चि भूमिका साकारणारे रोहित शिंदे, आणि हवालदाराची भूमिका साकारणारे प्रसाद सोनवणे यांनी हि या नाटकात आपल्या भूमिका केल्यात. 

परंतु नाटकात काही ठिकाणी रंगमंचावरील प्रकाशयोजना थोडी मागे पडलेली पाहायला मिळते. तर पारुलची भूमिका करणाऱ्या पात्राचा मराठी संवाद हा मराठी भाषिक वर्गाला साजेसा वाटत नाही. मात्र या पात्राने अभिनय मात्र उत्तम केलाय. नाटकातील हवालदार आणि ऍडव्होकेट हि भूमिका काढून जरी टाकली तरी नाटकावर फारसा काही परिणाम झाला असता असं वाटत नाही. नाटकात पात्रांची असणारी वेशभूषा आणि व्यक्तिमत्व हे बऱ्याच वेळा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. या नाटकात नेपथ्य देण्याचे काम अमित तिरमखे व चेतन गवळी यांनी केलं. संगीत सुमित खरात यांच, प्रकाशयोजना डॉक्टर किरण लद्दे यांची तर वेशभूषेचे  काम सौ.आश्विनी तिरमखे ,आरती सोनवणे, रंगभूषा प्रांजळ सपकाळ सुनीता इंगळे यांनी पाहिलीय.तर रंगमंच व्यवस्था प्रवीण शेलार आणि कल्पना निंबाळकर यांनी पाहिलीय. 

 मात्र या नाटकाच्या अंतिम पर्वात विकास या पात्राने स्वतःच्या फायद्यासाठी केलेले षडयंत्र आणि विकासच्या डावापासून वाचण्यासाठी नाटकातील शुभदा आणि लीना यांनी आत्मरक्षणासाठी रचलेला बनाव यापैकी लीना आणि शुभदाने केलेलं षडयंत्र हे अधिक योग्य म्हणावं लागेल. 

स्वतःच्या आत्मसंरक्षणासाठी स्त्रीला जर षडयंत्र रचावे लागलं तर ते परिस्थितीला देखील साजेस आणि योग्य आहे,  हे षडयंत्र या नाटकातून रंगमंचावर पाहायला मिळतो. हा संदेश शेवटच्या क्षणी  मिळतो आणि नाटकाचा पडदा पुन्हा बंद होतो.


प्रियंका पुंड.

टिप्पण्या